मावळत्या सूर्या नको काळजी करू
मी अंधाऱ्या वाटेतून जाईन कशी
तुझ्या किरणांच्या प्रकाशकणांना मी साठवलं आहे ओच्यात
मी चालत राहील एकेकाला वाटेवरच्या काजव्यांवर उधळत...
त्यांच्या प्रकाशमय स्वरलहरींच्या जल्लोषात
धुंद श्वास मनात भरून चांदण्यांना हास्यात सामावून घेत,
तुझ्या भेटीचा ध्यास मनात ठेऊन चांदणपावलं टाकत राहीन...
जर थकले तर, निद्रादेवीच्या पंखांवर बसून
जाईल हरवून स्वप्नांच्या रंगील्या दुनियेत...
कळत नकळत सरेल रात...
मग पुन्हा तुझी माझी साथ!
दिवसभर गंमत गाणी
संध्याराणीच्या साक्षीने स्वप्नांची लेणी!
पुन्हा तेच दंग होणे पुन्हा नवे दूराव्याचे बहाणे
पुन्हा ताजेतवाने होणे, पुन्हा नवे जीवनगाणे!