गंगा आरती एक विलक्षण अनुभूती

Devotional By Dr. Surekha S. Bhalerao Published: December 2025

साक्षात चैतन्य लाटांतून सळसळणारें

निर्मळ पवित्र शुभ्रतेतून झळकणारे

गंगामाते तुझे अथांग रूप; नजरेत न ठरणारे

काहीसे गूढ, अंतर्मुख करायला लावणारे

थेट अंतरातील गाभाऱ्याला ओढ लावणारे

तुझ्या तिरावरील आरतीचा झंकार

भक्तांनी मनःपूर्वक केलेला जयजयकार

आजही मनात रेंगाळतोय, आठवणींत साकारतोय

नादबद्ध, तालबद्ध घंटानाद मनात घुमतोयं

आजही तुझ्या खळाळत्या लाटा मनात उसळतायत

तुझ्या पाण्याचा चैतन्यदायी स्पर्श पुनःपुन्हा साद घालतोय

एक विलक्षण अनुभूती मनात जागृत होतीय

गूढ पण तरीदेखील हवी हवीशी वाटणारी हुरहूर मनात घोंगावतीय

स्वतःला पूर्ण अन पवित्र करण्याचा शोध आता चालू झालाय

जीवनाच्या मिळालेल्या दानातून आपली देणी फिटवण्याचा मार्ग दिसू लागलाय

तूला अर्पिलेले दीप तर् प्रकाशमय तेजाने झळकत, कधीच निघालेत प्रवासाला,

त्यांचा मागोवा घेत आता, या संसाराची नाव पार करतांना, पैलतीराची वाट नक्की शोधायची !

सुरेखा