स्वप्नांचे इमले

Spiritual Wisdom By Dr. Surekha S. Bhalerao Published: December 2025

हवेतल्या गप्पा आणि वाऱ्यावरचे इमले कधी कधी बांधावे आणि

रंगवावे देखील...

वास्तवातल्या नको नकोशा जाणिवा होतात मग थोड्या क्षणांसाठी

धूसर...

काट्यांचे बोचरेपण सुद्धा होते जरासे बोथट,

एखाद्या वेदनाशामक गोळीप्रमाणे मिळतो तात्पुरता आराम,

​अथक​ चाललेल्या विचारांच्या चक्कीला!

त्यासाठी स्वप्नांची बीजे कल्पनेच्या हवेतील राज्यात पेरायची...

विश्वासाच्या बळावर आपल्या मनातच ती रुजवायची.

अधून मधून उघड्या किंवा बंद डोळ्यांनी ती जोखायची...

बऱ वाटत श्वासांना, क्षणभर सत्यात आणतात अभासांना!

थंड वाटते डोळ्यांना, स्वप्नांचे रंगलेले इमले अनुभवतांना!

अन मग, मन आपसुकच विसावते त्यांच्या निवऱ्याला,

तेवढा आराम पुरतो पुन्हा नव्याने जगण्याच्या प्रेरणेला!

मग स्वप्नं अलगद सत्यात उतरतात आणि

जीवनात नव्याने रंग भारतात!

परत नवे इमले बांधायची स्फूर्ती देतात...